
एका टेकडीवर एक छोटंसं झाड होतं
खुंटलेलं, उगाच वेडंवाकडं वाढलेलं
आजूबाजूला सगळंच ओसाड, भकास
ना पशु-पक्षी, ना माणसांचा त्रास.
नुसताच सरसरणारा वारा,
बेछूट, बेधडक भिडणारा
पण तो मात्र एका स्थळी स्थिर
सोशिकपणे वाऱ्याला तोंड देणारा.
जवळच दुसऱ्या एका टेकडीवर
होते त्याचे काही भाऊबंद
भलीमोठी त्यांची उंची
खोडही त्यांचे रुंद.
बाजूच्या टेकडीवरच्या जंगलाकडे
तो रोजच उदास नजरेने पाही
त्याला आठवे तो काळ
जेव्हा इकडे ही नांदत होती हिरवाई.
वेडावाकडा असला तरी
त्याच्या कुटुंबाचा तो लाडका होता
जास्त नसले जरी
मोजक्या मित्राचा तो यार होता.
एके दिवशी मात्र, या आनंदवनावर काळ बरसला
कुऱ्हाडीच्या घावागणिक, एक एक जण धारातीर्थी पडला
त्यांच्या शेवटच्या घटकेतही ते, 'काळजी घे' सांगत निघून गेले
कुणाच्यातरी स्वार्थाग्निवर, त्याचे कुटुंब स्वाहा झाले.
आता आपली पण वेळ आली असे समजून
त्याने डोळे घट्ट मिटून घेतले
कुऱ्हाडीच्या घावाच्या अपेक्षेने
त्याने अंग अकसून घेतले
पण तो कुऱ्हाडीचा घाव कधी आलाच नाही
डोळे उघडले, तेव्हा गमावले होते त्याने सर्वकाही.
कावरा-बावरा झालेला तो, समजत नव्हते काही त्याला
"का बरं ह्या लोकांनी सोडून दिले आपल्याला?
ज्या फांद्यांची वाटे लाज, त्यांनीच आपल्याला वाचवलं
कमी उंचीमुळेच मला, कदाचित हे जीवनदान मिळालं."
म्हणता म्हणता दिवस गेले, एकटेपणाची त्याला सवय होऊ लागली
काळाच्या मलमाने मनाची जखम हळू हळू भरून येऊ लागली
इतकी वर्ष मायेच्या सावलीखाली वाढलेला तो, आता लख्ख प्रकाशात न्हाऊन निघत होता
त्याच्या वेड्यावाकड्या फांद्या तो, स्वच्छंदपणे इकडे तिकडे पसरवत होता.
पण तरीही कधी कधी एकांताचे ढग आकाशात गर्दी करायचे
पावसाचे पाणी अंगावर घेण्याच्या आनंदात कुणाला सहभागी करायचे?
आजूबाजूला असणारी पक्ष्यांची वर्दळ कधीच नाहीशी झाली होती
एकांताची ती भयाण शांतता त्याचे मन आतून पोखरत होती.
रोज सकाळी सूर्योदयाची किरणे त्याच्या मनात एक आशा पल्लवित करत
दिवसभर त्याचे भोळेभाबडे मन त्या सुंदर भविष्यात रमत
"आज तरी हे पवनदेव एखादे बीज घेऊन येतील
माझ्यापाशी येऊन हलकेच ते त्याला धरती मातेच्या कुशीत सोपवतील
वरुणदेवाच्या आशीर्वादाने ते बियाणे पण ह्या आशेसारखेच अंकुरावे
माझ्या आयुष्यातल्या या वनवासाच्या अध्यायाने पण इथेच संपावे."
पण त्याची ही प्रतीक्षा प्रतिक्षाच रहायची
दिवस सरून पुन्हा सूर्यास्ताची वेळ व्हायची
मावळत्या सूर्याने आकाश लाल-नारंगी रंगाने भरून जायचे
त्या मावळत्या सूर्यबिंबाकडे बघून त्याला अजूनच भरून यायचे.
कधी कधी रागही यायचा त्याला त्याच्या परिस्थितीचा
मग त्वेषाने जाब विचारी तो सूर्यदेवाला
"हे सूर्यदेवता, तू तर साक्षी आहेस या जगाचा,
सांग मला, कधी संपणार माझ्या आयुष्याची ही काळी रात्र
हवंय तरी काय असं मला फार मोठं?
कुणाची तरी सोबत, आपलं म्हणणारा एक मित्र."
त्याचे ते हृदयद्रावक स्वर कानी पडायचे सूर्यदेवाच्या
पण सांगावे काय आणि कसं, याने जखडून जायची त्यांची वाचा
त्यांच्याकडे त्या झाडाच्या प्रश्नांचं उत्तर नव्हतं
त्यांची साक्ष म्हणजे त्यांचं मौन होतं, फक्त मौन होतं...

Comments
Post a Comment